18 July, 2025

खरीपासाठी सुधारीत प्रधानमंत्री पिक विमा योजना औंढा ना. तालुक्यातील जन सुविधा केंद्र व आपले सरकार सेवा केंद्र चालकांना सूचना

हिंगोली (जिमाका), दि. 18 : सुधारीत प्रधानमंत्री पिक विमा योजनेत विविध नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसानीपासून शेतकऱ्यांना अधिक संरक्षण देण्याच्या दृष्टीकोनातून हिंगोली जिल्ह्यात प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविण्यात येत आहे. खरीप हंगाम विमा योजनेतील पिके खरीप ज्वारी, तूर, मूग, उडीद, सोयाबीन, कापूस या अधिसूचित पिकांसाठी अधिसूचित क्षेत्रातील शेतकऱ्यांना सहभागी करून घेण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने 2025 मध्ये घेतला आहे. शेतकऱ्यांना विमा योजनेत सहभाग घेण्यासाठी केंद्र शासनाचे पीक विमा पोर्टल www.pmfby-gov.in सुरु करण्यात आले आहे. विमा अर्ज भरण्यासाठी प्रति शेतकरी सीएससी केंद्रास रुपये 40 मानधन केंद्र शासनाने निर्धारित करून दिलेले आहे. ते संबंधित विमा कंपनी मार्फत सीएससी केंद्रास दिले जाते. त्यामुळे शेतकऱ्यांनी प्रति अर्ज संबंधित अधिसूचित पिकासाठी अधिसूचित क्षेत्रातील रक्कम रुपये या प्रमाणे सीएससी केंद्र चालकांना देऊन अर्ज करावा. अतिरिक्त रक्कमेची मागणी केल्यास शेतकऱ्यांनी तालुका कृषि अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. जेणे करुन अशा सीएससी केंद्रचालकावर कायदेशीर कारवाई करता येईल. जास्त पैसाची मागणी केल्यास शेतकऱ्यांनी आपली तक्रार टोल फ्री क्रमांक 14447 यावर करावी. तसेच कोणत्याही सीएससी केंद्र चालकांने अथवा शेतकऱ्यांने शासकीय जमीन, शासकीय गायरान, मंदीर, देवस्थान, संस्थान जमीन अथवा दुसऱ्या शेतकऱ्याचा परस्पर पीक विमा उत्तरवू नये. अशा तक्रारी प्राप्त झाल्यास संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल, अशा सूचना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी दिल्या आहेत. महत्त्वाच्या बाबी : अंतिम मुदत 31 जुलै 2025 आहे. योजनेत भाग घेण्यासाठी शेतकऱ्याचा अॅग्रीस्टॅक नोंदणी क्रमांक आणि ई- पीक पाहणी बंधनकारक आहे. अधिसूचित क्षेत्रात, अधिसूचित पिके सर्व शेतकरी या योजनेत भाग घेऊ शकतात. कर्जदार आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांना योजनेतील सहभाग ऐच्छिक आहे. ई-पीक पाहणी. विमा घेतलेले पीक यात तफावत आढळल्यास विमा अर्ज रद्द होईल. भरलेला विमा हप्ता जप्त होतो. विमा अर्ज भरण्यासाठी प्रति शेतकरी सीएससी विभागास रुपये 40 मानधन केंद्र शासनाने निर्धारीत करून दिले आहे. ते संबंधित विमा कंपनीमार्फत सीएससी विभागास दिले जाते. त्यामुळे शेतकऱ्यांनी त्यांचा विमा हप्ता व्यतिरिक्त इतर शुल्क सीएससी चालकांना देऊ नये. एखाद्या अर्जदाराने बोगस किवा फसवणूक करून विमा योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना पुढील किमान पाच वर्ष काळ्या यादीत टाकून शासनाच्या कोणत्याही योजनेचा लाभ मिळणार नाही. सर्व पिकांसाठी जोखीमस्तर 70 टक्के आहे. विमा संरक्षणाच्या बाबी : योजनेअंतर्गत खरीप व रब्बी हंगामाकरिता पीक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत विविध नैसर्गिक आपत्ती किंवा पीक उत्पादनावर विपरीत परिणाम करणाऱ्या इतर बाबींमुळे हंगामाच्या शेवटी पीक कापणी प्रयोग आधारे, तांत्रिक उत्पादना आधारे, सदर महसूल मंडळामध्ये पिकाच्या उंबरठा उत्पादनाच्या तुलनेत येणारी घट गृहीत धरुन नुकसान भरपाई देय राहील. विमा योजनेत सहभागी होण्याकरिता शेतकऱ्यांने हे करावे अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकासाठी पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यास या विमा योजनेत सहभाग बंधनकारक नाही, मात्र त्यासाठी शेतकऱ्याने विमा योजना भाग घेण्याच्या अंतिम दिनांकाच्या आधी किमान 7 दिवस संबंधित बँकेस विमा हप्ता न भरणे बाबत लेखी कळवणे गरजेचे आहे. बिगर कर्जदार शेतकऱ्याने आपला अॅग्रीस्टॅक नोंदणी क्रमांक, सातबारा उतारा, बँक पासबूक, आधार कार्ड आणि पीक पेरणीचे स्वयं घोषणापत्र घेवून प्राधिकृत बँकेत विमा अर्ज देवून व हप्ता भरुन सहभाग घ्यावा. या शिवाय कॉमन सर्विस सेंटर (सीएससी) आपले सरकारच्या मदतीने आपण विमा योजनेत सहभाग घेऊ शकता किंवा www.pmfby.gov.in या पोर्टलचे सहाय्य घेऊ शकता. योजनेच्या माहितीसाठी संपर्क : पीक विमा योजनेच्या अधिक माहितीसाठी किंवा नुकसान भरपाई माहितीसाठी केंद्र शासनाचे कृषि रक्षक पोर्टल हेल्पलाईन 14447 वर संपर्क करावा. संबंधित विमा कंपनी, स्थानिक कृषि विभाग कार्यालयाशी संपर्क साधावा. नियुक्त विमा कंपनी : हिंगोली जिल्ह्याकरिता भारतीय कृषि विमा कंपनी, पत्ता : मुंबई क्षेत्रीय कार्यालय, लोकचेंबर्स, मरोळ मरोशी रोड, मरोळ, अंधेरी पूर्व, मुंबई, महाराष्ट्र-400059, ई-मेल : pikvima@aicofindia.com , औंढा नागनाथ तालुका विमा प्रतिनिधी पवन गायकवाड मो. 8308889773 यांची खरीप हंगाम 2025 व रब्बी हंगाम 2025-26 या एक वर्षासाठी निवड करण्यात आलेली आहे. पीक विम्याच्या तक्रार निवारण व नोंद करण्यासाठी शिवप्रसाद सखाराम संगेकर, तालुका कृषी अधिकारी, औंढा नागनाथ (मो. 8408840487) यांच्याशी संपर्क साधावा. ज्वारी या पिकासाठी विमा संरक्षित रक्कम प्रती हेक्टरी 33 हजार रुपये असून शेतकऱ्यांसाठी विमा हप्ता 82.50 रुपये आहे. सोयाबीन या पिकासाठी विमा संरक्षित रक्कम प्रती हेक्टरी 58 हजार रुपये असून शेतकऱ्यांसाठी विमा हप्ता 1160 रुपये आहे. मूग या पिकासाठी विमा संरक्षित रक्कम प्रती हेक्टरी 26 हजार रुपये असून शेतकऱ्यांसाठी विमा हप्ता 65 रुपये आहे. उडीद या पिकासाठी विमा संरक्षित रक्कम प्रती हेक्टरी 25 हजार रुपये असून शेतकऱ्यांसाठी विमा हप्ता 62.50 रुपये आहे. तूर या पिकासाठी विमा संरक्षित रक्कम प्रती हेक्टरी 43 हजार रुपये असून शेतकऱ्यांसाठी विमा हप्ता 430 रुपये आहे. कापूस या पिकासाठी विमा संरक्षित रक्कम प्रती हेक्टरी 60 हजार रुपये असून शेतकऱ्यांसाठी विमा हप्ता 600 रुपये आहे. योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम मुदत दि. 31 जुलै, 2025 आहे. परंतु सर्व शेतकऱ्यांनी अंतिम दिनांकाची वाट न पाहता अधिसूचित पिकांची माहिती घेऊन विहित मुदतीमध्ये नजीकच्या ई-सेवा केंद्र किंवा बँक, वित्तीय संस्था यांच्याशी संपर्क साधून आपल्या पिकाचा पीक विमा उतरवून घ्यावा, असे आवाहन हरीष गाडे, तहसीलदार तथा तालुकास्तरीय पीक विमा समिती, औंढा नागनाथ यांनी केले आहे. *****

No comments: