25 July, 2025
हिंगोली जिल्ह्यासाठी उद्या ऑरेंज अलर्ट जाहीर
* प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र मुंबईकडून सतर्कतेचा इशारा; नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन
हिंगोली (जिमाका), दि. 25: प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी दिलेल्या हवामान अंदाजानुसार हिंगोली जिल्ह्यात दि. 25 जुलै 2025 रोजी येलो अलर्ट तर दि. 26 जुलै 2025 रोजी ऑरेंज अलर्ट घोषित करण्यात आलेला आहे. या कालावधीत जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ताशी 30 ते 40 किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता असून, विजेच्या कडकडाटासह आणि ढगांच्या गडगडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
या नैसर्गिक स्थितीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. संभाव्य धोका टाळण्यासाठी खालील मार्गदर्शक सूचना लागू करण्यात आल्या आहेत:
काय करावे:
विजेच्या गडगडाटासह पावसाची शक्यता असल्यास बाहेर जाणे टाळा. मोकळ्या जागेत असल्यास सखल भागात जाऊन गुडघ्यात डोके घालून बसा. विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्या. बाल्कनी, छत किंवा ओट्यावर थांबू नका. घरातील विजेची उपकरणे बंद करा. तारांचे कुंपण, विजेचे खांब व इतर धातूच्या वस्तूंपासून दूर रहा. पाण्यात उभे असल्यास तत्काळ सुरक्षित जागी हलवा.
काय करू नये:
विजा चमकत असताना लँडलाईन फोन, विद्युत उपकरणांचा वापर, शॉवरखाली अंघोळ किंवा बेसिनच्या नळाला स्पर्श करू नये. धातूच्या तंबू किंवा शेडमध्ये आसरा घेऊ नका. उंच झाडाखाली थांबू नका. धातूच्या उंच मनोऱ्याजवळ थांबू नका. उघड्या दरवाजातून किंवा खिडकीतून वीज पाहण्याचा प्रयत्न करू नका.
हवामान खात्याच्या सूचनांनुसार जिल्हा प्रशासन सतर्क असून आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा तयार ठेवण्यात आली आहे. नागरिकांनी सामाजिक माध्यमांवरील अपप्रचार टाळून अधिकृत माहितीवर विश्वास ठेवावा, असेही प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
*******
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment