08 July, 2025

ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा द्याव्यात -- जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

• जिल्हाधिका-यांकडून आरोग्य विभागाचा आढावा हिंगोली(जिमाका), दि.08: ग्रामीण भागातील नागरिकांना प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये मूलभूत सुविधा उपलब्ध करुन दर्जेदार आरोग्य सेवा द्याव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आढावा बैठकीत दिल्या. जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात नियामक मंडळाच्या बैठकीत जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेचा सविस्तर आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली रमेश, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके, शासकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चक्रधर मुंगल, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.देवेंद्र जायभाये, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. सतिश रुणवाल, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दीपक मोरे, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पांडुरंग फोपसे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ शैलेजा कुप्पास्वामी, सर्व तालुका आरोग्य अधिकारी आदींची उपस्थिती होती. जिल्हा कुष्ठरोग मुक्त व क्षयरोग मुक्त करण्यासाठी अभियान यशस्वीपणे राबवावे. त्यासाठी सर्व प्राथमिक आरोग्य केंद्राला महिनानिहाय उद्दिष्ट ठरवून द्यावे. उद्दिष्टानुसार विशेष तपासणी मोहिम राबवून रुग्णांचा शोध घ्यावा व उद्दिष्ट पूर्तता करावी. निक्षय मित्रांची नोंदणी करावी. बोगस डॉक्टरांवर नियमानुसार कारवाई करावी. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे गावात व इतर ठिकाणी पाणी साठणार नाही, याची दक्षता घ्यावी. ॲबेटींगची धूर फवारणी करावी. पुरेसा औषधसाठा उपलब्ध ठेवावा. डेंग्यू पसरणार नाही,याची दक्षता घ्यावी. राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत शाळा परिसरातील तंबाखू विक्रेत्यांवर कारवाई करावी. प्राथमिक आरोग्य केंद्रातील प्रसूतीचे प्रमाण वाढवावे. त्यासाठी प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात होणारी प्रसूती व रेफरचे प्रमाण याची माहिती केंद्रनिहाय उपलब्ध करुन द्यावी. स्क्रीनिंग टेस्ट वाढवावेत. 15 व्या वित्त आयोगातून होणाऱ्या आरोग्य उपकेंद्राची सद्यस्थिती याची माहिती द्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी यावेळी केल्या. यावेळी एनकॉसचा आढावा घेताना 11 प्राथमिक आरोग्य केंद्र एनकॉस करण्याच्या सक्त सूचना देण्यात आल्या. तसेच संजीवनी अभियान, राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत राबविल्या जाणाऱ्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी, प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या सुविधा आणि आरोग्य सेवा यांचा आढावा घेण्यात आला. बैठकीत जिल्हा एड्स नियंत्रण कार्यक्रम, क्षयरोग, निक्षय मित्र, कुष्ठरोग, एनसीडी, माता बाल संगोपन कार्यक्रम, जननी शिशु सुरक्षा योजना, ओरल हेल्थ, मेंटल हेल्थ, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम, पीसीपीएनडीटी अंतर्गत कारवाई, जलजन्य व कीटकजन्य आजार, फ्लोरोसिसचे रुग्ण आढळून आलेल्या गावांचा आढावा घेण्यात आला. यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, सर्व कार्यक्रम अधिकारी व राष्ट्रीय आरोग्य अभियानातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. ******

No comments: