10 September, 2025
नेपाळमध्ये अडकलेल्यांसाठी हेल्पलाइन क्रमांक जारी
हिंगोली, दि.१० (जिमाका): नेपाळ येथील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर हिंगोली जिल्ह्यातील नागरिक पर्यटन किंवा इतर कारणांमुळे तिथे अडचणीत सापडलेल्या त्यांच्या परिवाराने किंवा पालकांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कार्यालयातील 9405408939 या क्रमांकावर माहिती द्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
नेपाळ येथे स्थानिक कारणांमुळे हिंसाचार उफाळला आहे.
भारतातून तसेच मुख्यतः महाराष्ट्रातून नेपाळमध्ये पर्यटन तसेच इतर कारणाने जे नागरीक गेले आहेत त्यांना देखील हिंसाचाराचा फटका बसला असल्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने सदरील क्रमांक जारी करण्यात आला असल्याचे प्रसिद्धीपत्रकाव्दारे कळविले आहे.
****
राखीव निकालाबाबत उमेदवारांनी 15 सप्टेंबरपर्यंत संकेतस्थळावर माहिती भरावी * शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा
हिंगोली (जिमाका), दि. 10 : शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा-2025 चे आयोजन ऑनलाईन पद्धतीने दिनांक 27 ते 30 मे आणि 2 ते 5 जून, 2025 या कालावधीत राज्यातील 26 जिल्ह्यांमध्ये 60 परीक्षा केंद्रांवर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने 8 दिवसामध्ये प्रतिदिन तीन सत्रात करण्यात आले होते. या परीक्षेस 2 लाख 28 हजार 808 परीक्षार्थी उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 2 लाख 11 हजार 308 उमेदवार परीक्षेस प्रविष्ठ झाले होते.
या परीक्षेचा निकाल दि. 18 ऑगस्ट, 2025 रोजी गुणयादी व गुणपत्रक महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. तसेच राखीव ठेवण्यात आलेल्या बी.एड. व डी.एल.एड. परीक्षेचे एकूण 6 हजार 320 प्रविष्ठ विद्यार्थी, उमेदवारांपैकी 2 हजार 789 विद्यार्थी उमेदवारांचा निकाल दि. 25 ऑगस्ट, 2025 रोजी प्रसिद्ध करण्यात आला आहे. तद्नंतर दि. 3 जून, 2025 रोजी 244 विद्यार्थी उमेदवारांचा निकाल प्रसिद्ध करण्यात आला आहे.
राखीव ठेवण्यात आलेल्या बी.एड. व डी.एल.एड. परीक्षेचे 6 हजार 320 प्रविष्ठ विद्यार्थी, उमेदवारांपैकी 3 हजार 187 प्रविष्ठ विद्यार्थी उमेदवारांनी 2 मे 2025 अन्वये महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या दिलेल्या संकेतस्थळावरील लिंकद्वारे अद्यापही माहिती न भरल्याने अशा 3 हजार 187 विद्यार्थी उमेदवारांचा निकाल राखीव ठेवण्यात आलेला आहे. या उमेदवारांनी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिलेल्या लिंकमध्ये माहिती व अंतिम वर्षास प्रविष्ट उत्तीर्ण असल्याबाबतचा निकाल दि. 15 सप्टेंबर, 2025 पर्यंत देण्यात यावा. यानंतर माहिती सादर करणाऱ्या विद्यार्थी उमेदवारांच्या राखीव निकालाबाबत विचार केला जाणार नाही. याची सर्व विद्यार्थी उमेदवारांनी गांभीर्याने नोंद घ्यावी, असे आवाहन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्तांनी केले आहे.
*****
राष्ट्रीय लोकन्यायालयाचे शनिवारी आयोजन
हिंगोली (जिमाका), दि. 10 : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या आदेशानुसार हिंगोली जिल्ह्यातील सर्व न्यायालयात शनिवार, (दि.13) रोजी सकाळी 10.30 वाजता राष्ट्रीय लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले आहे.
या राष्ट्रीय लोकन्यायालयामध्ये बँक, ग्रामपंचायत, नगर परिषद, एमएसईबी व फायनान्स यांचे वाद दाखलपूर्व प्रकरणे हे तडजोडीच्या आधारे निकाली काढण्यात येणार आहे. या राष्ट्रीय लोकन्यायालयामध्ये सर्व विधिज्ञांनी जास्तीत जास्त प्रकरणे ठेवून तडजोड करुन निकाली काढावीत, असे आवाहन तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा न्यायाधीश टी. एस. अकाली यांनी केले आहे.
*****
एकरकमी कर्जफेड करणारांना थकीत व्याजात 50 टक्के सवलत
हिंगोली (जिमाका), दि. 10 : महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या संपूर्ण थकीत कर्ज एकरकमी भरणा करणाऱ्या लाभार्थ्यांस थकीत व्याज रकमेत 50 टक्के सवलत देण्याबाबतची सुधारित एकरकमी योजना दि. 31 मार्च, 2026 पर्यंत लागू करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, रिसाला बाजार, हिंगोली-413513 (दूरध्वनी क्र. 02456-224442) येथे संपर्क साधावा.
त्यानुसार थकबाकीदार लाभार्थ्यांनी या योजनेचा फायदा घेऊन कर्जमुक्त व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक एस. एन. झुंजारे यांनी केले आहे.
*****
09 September, 2025
हिंगोलीत संचालकांची एक दिवशीय कार्यशाळा संपन्न
हिंगोली (जिमाका), दि. 09 : जागतिक बँक अर्थसहायित मा. बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्प अंतर्गत टीएसए (प्लॅडियम) संस्थेमार्फत समुदाय आधारित संस्थेच्या संचालकांची जिल्हास्तरीय एक दिवसीय कार्यशाळा आज येथील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या आत्मा सभागृहात आयोजित करण्यात आली होती.
यावेळी ॲक्सेस टू फायनान्स प्रोक्रूमेंट असोसिएट आरआययूचे हनुमंत आरदवाड, ॲग्री बिझनेस असोसिएट आरआययूचे मंगेश लांबाडे, फूड सेफ्टी ॲन्ड क्वालिटी असोसिएट आरआययूचे सचिन कच्छवे, जिल्हा समन्वयक वैभव तांबडे, यांच्या सर्व टीमने समुदाय आधारित संस्थेच्या संचालकांना विविध विषयांवर प्रात्यक्षिकपणे मार्गदर्शन केले. या कार्यशाळेचे प्रास्ताविक जी. बी. बंटेवाड यांनी केले.
या कार्यशाळेस जिल्हा अंमलबजावणी कक्षाचे नोडल अधिकारी जी.बी. बंटेवाड, पुरवठा व मूल्यसाखळी तज्ञ जी. एच. कच्छवे व कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, कंपनीचे संचालक उपस्थित होते. या कार्यशाळेचे सूत्रसंचालन वैभव तांबडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन जी. एच. कच्छवे यांनी केले.
******
‘श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रमातून ७.४ लाख नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी • १६,७९८ नागरिकांनी केले रक्तदान
मुंबई, दि. ९ : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ या विशेष उपक्रमाला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या पुढाकाराने आणि विविध आरोग्य संस्थांच्या सहकार्याने राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे लाखो नागरिकांपर्यंत मोफत आरोग्यसेवेचा लाभ पोहोचला.
राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये २८ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर दरम्यान १२,६५५ आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले. या शिबिरांतून ७ लाख ४०७३ नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान आजार आढळलेल्या १८,८०० रुग्णांना तज्ज्ञांकडे पुढील उपचाराकरिता पाठविण्यात आले. तसेच, नागरिकांनी मोठ्या संख्येने रक्तदान करून सामाजिक जबाबदारी पार पाडली असून २३६ शिबिरांतून एकूण १६,७९८ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
या अभियानात मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष, महात्मा फुले जन आरोग्य योजना, शासकीय वैद्यकीय महाविद्यालये, जिल्हा रुग्णालये तसेच धर्मादाय रुग्णालयांशी संलग्न तज्ज्ञ डॉक्टर व आरोग्य कर्मचारी यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. राज्यभरातील मोठ्या संख्येतील गणेश मंडळांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त सहकार्य करून लोकाभिमुख उपक्रम अधिक परिणामकारक करण्यास हातभार लावला.
२८ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर २०२५ दरम्यान ‘श्री गणेशा आरोग्याचा’ अभियानात :
एकूण आरोग्य शिबिरे : १२,६५५
एकूण लाभार्थी रुग्ण : ७,०४,०७३
एकूण पुरुष लाभार्थी : ३,१३,५०८
एकूण महिला लाभार्थी : ३,०५,०३४
लहान बालक लाभार्थी : ८५,५०८
संदर्भित रुग्ण (पुढील उपचारासाठी पाठवलेले) : १८,८००
एकूण रक्तदान शिबिरे : २३६, एकूण रक्तदाते : १६,७९८
महाराष्ट्रातील ७.०४ लाख नागरिकांनी मोफत आरोग्य तपासणीचा लाभ घेतला, तर १६,७९८ दात्यांनी रक्तदान करून समाजासाठी योगदान दिले आहे.
जिल्हानिहाय सर्वाधिक योगदान
सर्वाधिक शिबिरे : पुणे – २५२५
सर्वाधिक रुग्ण तपासणी : पुणे – १,६५,७१८
सर्वाधिक संदर्भित रुग्ण : पुणे – ३,६१३
सर्वाधिक रक्तसंकलन : कोल्हापूर – ४,५०४
बालकांचा सर्वाधिक सहभाग : पुणे – २०,७८१
गणेशोत्सवासारख्या मोठ्या सणाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन करणे ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अभिनव कल्पना प्रत्यक्ष उतरविण्यात आली. ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रमातून ७.४ लाखांहून अधिक नागरिकांना त्यांच्या आरोग्याची मोफत तपासणी करता आली. तपासणीदरम्यान आजार आढळलेल्या १८,८०० रुग्णांना पुढील मोफत उपचार दिले जाणार असल्याचे मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांनी सांगितले.
0000
निधी मागणीचे प्रस्ताव तात्काळ सादर करावेत - जिल्हाधिकारी राहुल गुप्ता
हिंगोली (जिमाका), दि. 09 : जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन 2025-26 अंतर्गत निधी मागणीचे परिपूर्ण प्रस्ताव आयपासवर अपलोड करुन तात्काळ सादर करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आढावा बैठकीत दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीस अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे, जिल्हा नियोजन अधिकारी अनिता लव्हारे, सहायक जिल्हा नियोजन अधिकारी गं. गो. चितळे, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे रमेश भडके यांच्यासह सर्व विभागप्रमुख यावेळी उपस्थित होते.
जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन 2025-26 अंतर्गत विविध विकास योजनांचे निधी मागणीचे परिपूर्ण प्रस्ताव तात्काळ सादर करावेत. विविध विकास योजनांचे परिपूर्ण प्रस्ताव वेळेत सादर न करणाऱ्या कार्यालय प्रमुखावर कारवाई करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी दिले.
यावेळी महावितरण, पोलीस, जिल्हा परिषद, पशुसंवर्धन विभाग, कृषि विभाग, जिल्हा आरोग्य विभाग, महिला व बालकल्याण, महिला व बालविकास विभाग, वन विभाग, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, सार्वजनिक बांधकाम विभाग, नगरविकास, परिवहन विभाग यासह विविध विभागांच्या प्रस्तावाबाबत चर्चा करण्यात आली. बैठकीत प्रशासनाच्या विविध विभागांना त्यांच्या जबाबदाऱ्या वेळेत पूर्ण करुन प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले.
आकांक्षीत तालुकाअंतर्गत सर्व कामाची माहिती पोर्टलवर अपडेट करावी
निती आयोगाच्या निर्देशांकानुसार आकांक्षीत तालुका हिंगोलीसाठी तयार करण्यात आलेल्या आराखड्यानुसार सर्व यंत्रणांनी कामे वेळेत पूर्ण करावेत. केलेल्या कामाची माहिती पोर्टलवर वेळोवेळी अपडेट करावी. तसेच जिल्हा वार्षिक योजनेत ज्या बाबीसाठी निधी नाही ती कामे आकांक्षीत उपक्रमांतर्गत प्राप्त होणाऱ्या निधीतून करावेत, असे निर्देशही जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी यावेळी दिले.
*******
जलेश्वर तलावातील मत्स्यव्यवसायासाठी 18 सप्टेंबर रोजी लिलाव
हिंगोली (जिमाका), दि. 09 : हिंगोली तालुक्यातील सर्व्हे क्र. 3 मध्ये असलेल्या जलेश्वर तलावात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा आवक झाला आहे. यापूर्वी महसूल उत्पन्न वाढ होण्याकामी जलेश्वर तलावात मत्स्य उत्पादनासाठी लिलावाद्वारे ठेक्याने देण्यात येत होता. यावर्षी देखील परंपरेनुसार पुढील 5 वर्षासाठी जलेश्वर तलाव जाहीर लिलावाद्वारे ठेक्याने देण्यात येणार आहे. या कामी ग्रामविकास विभागाच्या दि. 30 डिसेंबर, 2020 च्या परिपत्रकान्वये सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय (तां.) हिंगोली यांच्या दि. 20 ऑगस्ट, 2025 च्या पत्रानुसार तहसील कार्यालयास ठेक्याची वार्षिक सरासरी रक्कम कळविली आहे. त्यानुसार सर्व्हे क्र. 03 जलक्षेत्र 13 हेक्टर जलेश्वर तलावाची मत्स्यव्यवसायासाठी माहे सप्टेंबर 2025 ते सप्टेंबर 2030 पर्यंत या 5 वर्षे कालावधीसाठी हिंगोली तहसील कार्यालयात दि. 18 सप्टेंबर, 2025 रोजी सकाळी 11 वाजता लिलाव घेण्यात येणार आहे.
या तलावासाठी ज्याची उच्चतम बोली जास्त असेल त्यास लिलाव अंतिम करण्यात येईल. या लिलावात केवळ नोंदणीकृत संस्थांनाच भाग घेता येईल. यासाठी दि. 15 सप्टेंबर पर्यत हिंगोली तहसील कार्यालयात कार्यालयीन वेळेत अर्ज दाखल करता येईल. प्राप्त अर्जाची छाननी दि. 17 सप्टेंबर रोजी करण्यात येणार असून प्रत्यक्ष लिलाव दि. 18 सप्टेंबर , 2025 रोजी हिंगोली तहसील कार्यालयात होणार आहे. या ठेक्याची आधारभूत किंमत 2 लाख 48 हजार 625 आहे. तर अनामत रक्कम 25 हजार रुपये असणार आहे.
याबाबतच्या अटी व शर्ती तहसील कार्यालय हिंगोली व सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय हिंगोली यांच्या कार्यालयात वाचनासाठी नोटीस बोर्डावर डकविण्यात आले असल्याची माहिती तहसीलदार, हिंगोली यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.
*******
महिला लोकशाही दिनाचे सोमवारी आयोजन
हिंगोली (जिमाका), दि. 09 : राज्यघटनेने प्रत्येक नागरिकाला समान हक्क व समान संधी असा मूलभूत हक्क दिलेला आहे. त्याअंतर्गत समस्याग्रस्त व पीडित महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे. तसेच त्यांच्या तक्रारी, अडचणी यांची शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी एक प्रभावी उपाययोजना म्हणून जिल्हास्तरावर दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी किंवा तिसऱ्या सोमवारी सार्वजनिक सुट्टी असल्यास त्यानंतर येणाऱ्या कामकाजाच्या दिवशी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन राबविण्यात येतो.
माहे सप्टेंबर, 2025 च्या महिला लोकशाही दिनाचे आयोजन सोमवार, (दि. 15 सप्टेंबर) रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले आहे.
समस्याग्रस्त व पीडित महिलांनी त्यांच्या अडचणी मांडण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, दुसरा मजला, कक्ष क्र. एस-7, हिंगोली यांच्या कार्यालयात सादर करावेत. यामध्ये न्याय प्रविष्ठ प्रकरणे, विहित नमुन्यात नसणारे व आवश्यक ती कागदपत्रे न जोडलेले, सेवा, आस्थापनाविषयक बाबी, तक्रार निवेदन वैयक्तिक स्वरुपाची नसेल असे अर्ज स्विकारले जाणार नाहीत.
समस्याग्रस्त व पीडित महिलांनी शासनाने उपलब्ध करुन दिलेल्या व्यासपीठाचा उपयोग आपल्या अडचणी सोडविण्यासाठी करावा, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे.
******
08 September, 2025
गारमेंटवर आधारित उद्योजकांसाठी पाच दिवशीय कार्यशाळेचे आयोजन, आज नोंदणी करण्याचे आवाहन
हिंगोली (जिमाका), दि. 08 : महाराष्ट्र राज्य लघु उद्योग विकास महामंडळ मुंबई पुरस्कृत व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र हिंगोली यांच्या वतीने आयोजित हिंगोली जिल्ह्यातील गारमेंटवर आधारित उद्योजकांसाठी कौशल्यवृध्दी विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. या कार्यशाळेत महाराष्ट्र राज्य औद्योगिक समूह विकास योजना, वस्त्रोद्योग क्षेत्रातील विविध कर्ज योजना, राष्ट्रीय तांत्रिक वस्त्रोद्योग अभियान, महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग धोरण, वस्त्रोद्योग क्षेत्रातील क्षमता वाढवण्याची योजना या विषयावर कार्यशाळेत मार्गदर्शन मिळणार आहे. ही कार्यशाळा दि. 11 सप्टेंबर, 2025 पासून पाच दिवस घेण्यात येणार आहे.
यासाठी उमेदवार हा जिल्ह्यातील रहिवासी असणे आवश्यक आहे. त्याच्याकडे व्यवसायाचे उद्यम नोंदणी प्रमाणपत्र आणि टीसी, पासपोर्ट फोटो इत्यादी कागदपत्रे जमा करुन आपली नाव नोंदणी उद्या दि. 9 सप्टेंबर, 2025 पर्यंत करण्यात यावी. नाव नोंदणीसाठी व अधिक माहितीसाठी कार्यक्रम आयोजक दत्ता उचितकर (मो. 9960189358) , महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, द्वारा जिल्हा उद्योग केंद्र, एस-12, प्रशासकीय इमारत, जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली येथे संपर्क साधावा, असे आवाहन महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे प्रकल्प अधिकारी सुधीर आठवले यांनी केले आहे.
*****
दसरा महोत्सवातील गाळे देण्यासाठी 15 सप्टेंबर रोजी बोली प्रक्रिया इच्छूकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन
हिंगोली (जिमाका), दि. 08 : येथील सार्वजनिक दसरा महोत्सव-2025 साजरा करण्याच्या दृष्टिकोनातून औद्योगिक व कृषी प्रदर्शनीमधील व बाहेरील नकाशाप्रमाणे नियोजित तयार केलेले गाळे (दुकाने) महोत्सव दरम्यान (कालावधी 14 दिवस) विविध दुकाने थाटण्याच्या दृष्टिकोनातून भाडे तत्वावर देण्यासाठी जाहीर बोली बोलून हर्राशी करण्यात येणार आहे. ही प्रक्रिया सार्वजनिक दसरा महोत्सव समितीचे सदस्य तथा गटविकास अधिकारी यांच्या देखरेखीखाली बोली बोलण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. ज्यांची बोली जास्तीत जास्त रकमेला जाईल अशा इच्छूक धारकांना हे गाळे (दुकान) त्याच ठिकाणी पैसे भरुन देण्यात येणार आहे.
इच्छूक धारकांनी वा व्यापाऱ्यांनी बोली बोलण्यासाठी रामलीला मैदान हिंगोली येथे दि. 15 सप्टेंबर, 2025 रोजी सकाळी 11 वाजता उपस्थित राहावे, असे आवाहन हिंगोली सार्वजनिक दसरा महोत्सव समितीचे सचिव तथा तहसीलदार यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
******
अवैध गौण खनिज उत्खनन, वाहतूकप्रकरणी जप्त वाहनांचा आज जाहीर लिलाव
हिंगोली (जिमाका), दि. 08 : अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक प्रकरणात जप्त करण्यात आलेली वाहने सेनगाव तहसील कार्यालयाच्या आवारात लावलेली आहेत. जप्त वाहने सोडविण्याबाबत संबधितांना वारंवार कळवूनही दंडाची रक्कम शासन जमा केलेली नाही. तसेच अवैध वाहतूक करताना वाहन जागेवर सोडून गेलेले वाहनांचे मालक दंडात्मक रक्कम भरण्यासाठी तहसील कार्यालयास आलेले नाहीत.
अशा एका वाहनाचा जाहीर लिलाव उद्या मंगळवार, दिनांक 9 सप्टेंबर, 2025 रोजी सकाळी 11 वाजता तहसील कार्यालय, सेनगाव येथे बोली पध्दतीने ठेवण्यात आला आहे. यासंबंधीच्या अटी व शर्तीबाबत तहसील कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन तहसीलदार, सेनगाव यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
******
07 September, 2025
जिल्हाधिकारी कार्यालयात राजे उमाजी नाईक यांची जयंती साजरी
हिंगोली, दि.07 (जिमाका) : राजे उमाजी नाईक यांची जयंती येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आज साजरी करण्यात आली. यावेळी राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी नायब तहसीलदार डी. एस. जोशी यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालय व प्रशासकीय इमारतीतील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. सर्वांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
********
06 September, 2025
श्री गणेशोत्सव काळात अवैद्य मद्य विक्रीवर छापे * ४ लाख ६६ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त
हिंगोली (जिमाका),दि.६: राज्य उत्पादन शुल्क हिंगोली विभागाने दिनांक ३, ४ व ५ सप्टेंबर २०२५ रोजी "श्रीगणेश उत्सव" काळात अवैध मद्य वाहतुकीवर करडी नजर ठेवत मोहीम राबवून राज्य उत्पादन शुल्कचे निरीक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाचे निरीक्षक तसेच हिंगोली दुय्यम निरीक्षक बिट क्र. १,२,३ यांच्या पथकाने सेनगांव, कळमनुरी, हिंगोली, वसमत व औंढा नागनाथ परिसरात अवैध मद्य विक्री, वाहतूक विरोधात छापे टाकून ०३ आरोपीविरुध्द महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ चे कलमांतर्गत गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.
या कारवाईत देशी मद्याच्या १८० मिलीच्या ८०८ बाटल्या (१८० मिली बॉटलचे १७ बॉक्स) व १ चार चाकी वाहन, २ दुचाकी वाहन असा एकूण ४ लाख ६६ हजार २८० रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करुन ०३ आरोपीविरुध्द महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ चे कलमांतर्गत गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.
वरील कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक आदित्य पवार यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक मोहन मातकर, निरीक्षक भरारी पथक रमेश चाटे, दुय्यम निरीक्षक टी.बी. शेख, कृष्णकांत पुरी (बिट क्र.१ व ३), प्रदीप गोणारकर (बिट क्र. २), तसेच सहायक दुय्यम निरीक्षक श्री.कांबळे, जवान आडे, राठोड, वाहनचालक वाघमारे व इतर कर्मचारी यांनी पार पाडली.
*****
04 September, 2025
जागतिक कौशल्य स्पर्धेत सहभागी होण्यासाठी 30 सप्टेंबरपर्यंत नोंदणी करा
हिंगोली (जिमाका), दि. 4 : जगातील सर्वात मोठ्या कौशल्य स्पर्धेचे आयोजन सन 2026 मध्ये करण्याचे निश्चित झाले आहे. या जागतिक कौशल्य स्पर्धेचे आयोजन दर दोन वर्षांनी करण्यात येते. सन 2026 मध्ये या स्पर्धेचे आयोजन शांघाई येथे करण्यात येणार असून ही जगातील सर्वात मोठी व्यावसायिक शिक्षण व कौशल्य उत्कृष्टता स्पर्धा आहे. हिंगोली जिल्ह्यातील 23 वर्षांखालील तरुणांसाठी त्यांच्यातील कौशल्य सादर करण्यासाठी ही सुवर्ण संधी आलेली आहे.
या स्पर्धेच्या पूर्व तयारीच्या दृष्टीने 63 क्षेत्रांशी संबंधित जिल्हा व राज्यस्तरावर व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, क्षेत्रातील कौशल्य स्पर्धा (सेक्टर स्कील कॉम्प्यूटेशन), विविध औद्योगिक आस्थापना यांच्या सहकार्याने कौशल्य स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. या स्पर्धेचे आयोजन प्रथमत: जिल्हास्तर, तद्नंतर विभागस्तर व राज्यस्तरावर होणार असून त्यात निवड झालेले उमेदवार देशपातळीवर व देशपातळीवरील निवड झालेले उमेदवार जागतिक नामांकनासाठी पाठविण्यात येतील.
जागतिक कौशल्य स्पर्धा सन 2026 मधील जिल्हास्तरीय कौशल्य स्पर्धेसाठी पात्रता निकष खालील प्रमाणे निश्चित करण्यात आलेले आहे.
जागतिक कौशल्य स्पर्धा 2026 करिता वयोमर्यादा हा एकमेव निकष ठरविण्यात आलेला आहे. या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी 50 क्षेत्रांकरिता उमेदवाराचा जन्म दिनांक 01 जानेवारी, 2004 किंवा तद्नंतरचा असणे अनिवार्य आहे. तसेच डिजिटल कन्स्ट्रक्शन, क्लाऊड कॉम्प्यूटींग, सायबर सेक्युरिटी, आयसीटी नेटवर्क इन्फ्रास्ट्रक्चर, ॲडिटीव्ह मॅन्यूफॅक्चरींग, इंडस्ट्रीयल डिझाईन टेक्नॉलॉजी, इंडस्ट्री 4.0, मेट्रॉनिक्स (Mechatronics), ऑप्टोइलेक्ट्रॉनिक टेक्नॉलाजी, रोबोट सिस्टीम इंटीग्रेशन, वाटर टेक्नॉलाजी, डेंटल प्रोस्थेटीक्स, एअरक्राफ्ट मेंटनन्स या क्षेत्रांसाठी उमेदवाराचा जन्म दिनांक 01 जानेवारी, 2001 किंवा तद्नंतरचा असणे अनिवार्य आहे.
शांघाई येथे आयोजित जागतिक कौशल्य स्पर्धा 2026 करिता जिल्हा, विभाग, राज्य आणि देशपातळीवरुन प्रतिभासंपन्न, कुशल उमेदवारांचे नामांकन करण्याच्या दृष्टीने आयोजित स्पर्धेसाठी सर्व आयटीआय, पॉलटेक्नीक, एमएसएमई टूल्स रुम, सीआयपीईटी, आयआयटी, अभियांत्रिकी महाविद्यालय, आयएचएम/हॉस्पिटॅलिटी इन्स्टिट्यूट, कार्पोरेट टेक्निकल इन्स्टीट्यूट, कौशल्य प्रशिक्षण संस्था, महाविद्यालये, महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ, एमएसबीव्हीइटी, खाजगी कौशल्य विद्यापीठ, फाईपन आर्ट कॉलेज, फ्लॉवर ट्रेनिंग इन्स्टीट्यूट, इन्स्टीट्यूट ऑफ ज्वलेरी मेकींग, कौशल्य प्रशिक्षण केंद्र (टीपी/टीसी/व्हीटीआय) इत्यादी सर्व संस्था, आस्थापनांना आपणाकडील विद्यार्थी, प्रशिक्षणार्थी, कामगारांना स्पर्धेत सहभागी होण्यासाठी अवगत करण्यात यावे.
या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी इच्छूक असणाऱ्या उमेदवारांनी https://www.skillindiadigital.gov.in या लिंकवर भेट देऊन दिनांक 30 सप्टेंबर, 2025 पर्यंत नोंदणी करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी या कार्यालयाचा दुरध्वनी क्र. 02456 - 224574 यावर किंवा कार्यालयाचा पत्ता : मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, 3 रा माळा, हिंगोली येथे कार्यालयीन वेळेत संपर्क करावा आणि जिल्ह्यातील जास्तीत जास्त उमेदवारांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त बा. सु. मरे यांनी केले आहे.
*****
दूध उत्पादक शेतकऱ्यांनी बँकेत जाताना प्रकल्प तयार ठेवावा-सुजित झोडगे
हिंगोली, दि. 4 (जिमाका): दुग्ध व्यवसायातून उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांनी बँकेत कर्जासाठी अर्ज करताना नियोजित प्रकल्प तयार ठेवावा, असे आवाहन जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक सुजित झोडगे यांनी यावेळी केले.
वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे येथे आयोजित दूध उत्पादक शेतकरी कर्जमेळाव्यात जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक श्री. झोडगे यांनी शेतकऱ्यांना आज मार्गदर्शन केले.
यावेळी पशुसंवर्धन उपायुक्त सखाराम खुणे, बँक व्यवस्थापक शालिकराम जाधव, प्रदीप महाजन, श्रीपाद दैठणकर, राहुल बेंदोले, सहाय्यक आयुक्त (वसमत) डॉ. अजय मुस्तुरे, राजेसाब कल्यापुरे आणि पशुधन पर्यवेक्षक प्रवीण पंचलिंगे उपस्थित होते.
उत्पादन वाढविण्यासाठी दूध उत्पादक शेतकऱ्यांनी कर्ज मिळविण्यासाठी बँकेत अर्ज करताना त्यांचा नियोजित प्रकल्प सोबत ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. या प्रकल्पामुळे बँकेला कर्ज मंजुरी सोपी होते, तसेच शेतकऱ्याच्या कर्ज परतफेडीबाबत अधिक स्पष्टता येते, असेही श्री. झोडगे म्हणाले.
केंद्र व राज्य शासनाच्या वतीने राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाकडून दूध उत्पादन वाढविणे आणि दुग्ध व्यवसाय उद्योगाला प्रोत्साहन देणे हा मुख्य उद्देश्य आहे. शासनाच्या मत्स्य व्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभागामार्फत हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. त्यामुळे या मेळाव्याचे आयोजन स्थानिक दुग्ध संकलन केंद्राच्या वतीने करण्यात आले होते. कार्यक्रमात शेतकऱ्यांना बँक कर्ज प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, तसेच प्रकल्प लेखनाविषयी सविस्तर माहिती देण्यात आली.
हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी दुधाचे उत्पादन वाढवण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता स्वतः पुढाकार घेत आहेत. दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना गायी, म्हशी किंवा शेळ्या खरेदीसाठी बँका कर्ज उपलब्ध करून देतात. मात्र शेतकऱ्यांनी प्रकल्प तयार ठेवणे गरजेचे असल्याचे पशुसंवर्धन उपायुक्त सखाराम खुणे यांनी सांगितले.
मेळाव्याला बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया, शिरड शहापूर व चौंढी रेल्वे स्टेशन शाखा व्यवस्थापक, तसेच पशुसंवर्धन विभागातील अधिकारी उपस्थित होते. परिसरातील पांगरा शिंदे, लोहरा, वापटी, कुपटी आदी गावांतील शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रमेश चेंडके यांनी केले तर संचालन प्रताप शिंदे यांनी केले. ज्ञानेश्वर वानखेडे यांनी आभार मानले. मेळावा यशस्वी करण्यासाठी सोपान मारकळ व साईनाथ शिंदे यांच्यासह शेतकऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
*****
शिक्षक अभियोग्यता परीक्षेची गुण यादी प्रसिद्ध
हिंगोली (जिमाका), दि. 4 : शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा 2025 ही दि. 27 ते 30 मे व दि. 2 ते 5 जून, 2025 या कालावधीत 26 जिल्ह्यांतील 60 परीक्षा केंद्रांवर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने पार पडली. परीक्षेचे आयोजन ऑनलाइन करण्यात आले होते. 8 दिवस तीन सत्रामध्ये ती घेण्यात आली.
परीक्षेसाठी 2 लाख 28 हजार 808 परीक्षार्थी, उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 2 लाख 11 हजार 308 जण प्रविष्ठ झाले होते. परीक्षेचा निकाल दि. 18 ऑगस्ट रोजी www.mscepune.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आला आहे. तसेच राखीव ठेवण्यात आलेल्या बीएड व डीएलएड परीक्षेचे 6 हजार 320 प्रविष्ठ विद्यार्थी, उमेदवारांपैकी 2 हजार 789 उमेदवारांचा निकाल दि. 25 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात आला आहे.
विद्यार्थी, उमेदवारांच्या मागणीनुसार पुन:श्च विहित नमुन्यातील निकाल www.mscepune.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात येत आहे. याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी, असे आवाहन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्तांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
***
राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त बॅडमिंटन स्पर्धा संपन्न
हिंगोली(जिमाका), दि. 4: जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांची जयंती साजरी करून व राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून हिंगोली येथील जिल्हा क्रीडा संकुलावर पुरुष खुला गट दुहेरी बॅडमिंटन स्पर्धा संपन्न झाल्या.
या स्पर्धेत अनिल शिंदे व नवाज खान या जोडीने प्रथम तर द्वितीय पारितोषिक अंकित राठोर व पियुष साहू या जोडीस मिळाले. तृतीय पारितोषिक संतोष कदम व आसाराम घुगे या जोडीने पटकावले. या पुरुष दुहेरी गटात सोळा संघाने सहभाग नोंदवला होता.
या स्पर्धेमध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांना जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाकडून आकर्षक ट्रॉफीसह पारितोषिक स्वरूपात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे कळमनुरीचे मुख्याधिकारी रविराज दरक, डॉ. श्रीधर कंदी, कृषी अधिकारी पंकज राठोड, दीपक अग्रवाल, अँड. दत्ता देशमुख, सचिन चौधरी, डॉ.योगेश नलवार, अतुल बोरकर उपस्थित होते.
स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी कार्तिक यादव, रुपेश सोनी, देविकांत देशमुख, विवेक चिलमुल, बब्बू अग्रवाल, डॉ.अजय शिरडकर, नकुल राठोड, रवि पाटील, रामेश्वर अग्रवाल, जितेश धूत, शेख वासिम व अर्जून पवार यांनी परिश्रम घेतले. या स्पर्धेकरिता जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश्वर मारावार, क्रीडा अधिकारी आत्माराम बोथीकर, क्रीडा अधिकारी प्रवीण कोंडेकर, क्रीडा अधिकारी गणेश बोडखे व क्रीडा मार्गदर्शक निळकंठ श्रावण यांचे मार्गदर्शन लाभले.
**
कापूस पिकावरील गुलाबी बोंडअळी नियंत्रणासाठी उपाययोजना करण्याचे जिल्हाधिकारी यांचे निर्देश
हिंगोली, दि. 4 (जिमाका) : जिल्ह्यातील कापूस पिकावर वाढत्या गुलाबी बोंडअळीच्या प्रादुर्भावाचे नियंत्रण करण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी उपाययोजना करण्याचे निर्देश कृषि विभागाला दिले. जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आर. एस. कदम, कृषी विज्ञान केंद्र तोंडापूरचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. पी. पी. शेळके, तालुका कृषी अधिकारी व शेतकरी प्रतिनिधी उपस्थित होते.
विषय विशेषज्ञ अजय सुगावे यांनी गुलाबी बोंडअळीच्या एकात्मिक व्यवस्थापनाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी लागवड करतेवेळी, लागवडीनंतर व हंगाम संपल्यानंतर या तिन्ही टप्प्यातील उपाययोजनांचे महत्त्व स्पष्ट केले. वेळेवर फेरोमोन ट्रॅपचा वापर, योग्यवेळी शिफारशीनुसार कीटकनाशक फवारणी, एकाच कीटकनाशकाचा वारंवार वापर टाळणे तसेच शेतातील अवशेष नष्ट करणे यावर भर देण्यात आला.
याशिवाय पिकावरील कीड-रोग सर्वेक्षण व क्रॉपसॅप सल्ल्यानुसार उपाययोजना सुचविल्या. प्रादुर्भावग्रस्त व गळालेली पाने व बोंडे गोळा करून नष्ट करावीत. गुलाबी बोंडअळीमुळे डोमकळ्या दिसल्यास त्या तोडून अळ्या नष्ट कराव्यात. प्रति हेक्टर 4 ते 5 कामगंध सापळे तर नर पतंग पकडण्यासाठी 25 सापळे लावावेत. हेक्टरी 25 पक्षीथांबे उभारून पक्ष्यांद्वारे अळ्यांचे नियंत्रण करावे. ट्रायकोग्रॉमाटॉयडीया बॅक्ट्री या परोपजीवी किडीचे कार्ड पिकावर लावावेत. निंबोळी अर्क किंवा अँझाडीरॅक्टीन 5 टक्के वापरून फवारणी करावी. आर्थिक नुकसान पातळी गाठल्यानंतरच शिफारस केलेल्या कीटकनाशकांचा आलटून पालटून वापर करावा. पायरेथ्रॉईड गटातील कीटकनाशकांची फवारणी नोव्हेंबरपूर्वी करू नये, अन्यथा पांढऱ्या माशीचा उद्रेक होऊ शकतो.
जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी संबंधित विभागांनी ही माहिती शेतकऱ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवावी, तसेच जनजागृती करावी, अशा सूचना दिल्या.
*****
02 September, 2025
अनुकंपा उमेदवारांना १५ सप्टेंबरला नियुक्ती देण्यासाठी जिल्हास्तरावर प्रक्रिया सुरू
हिंगोली, दि. २ (जिमाका): मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार १५० दिवसांच्या कार्यक्रमांच्या अंतर्गत गट-क संवर्गातील प्रतीक्षा सूचीतील अनुकंपा उमेदवारांना नियुक्ती देण्यासाठी वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार १५ सप्टेंबर रोजी हे नियुक्तीपत्र देण्यात येणार आहेत, असे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी प्रसिद्धीपत्रकाव्दारे कळविले आहे.
जिल्हास्तरावर सर्व कार्यालय प्रमुख,नियुक्ती प्राधिकाऱ्यांच्या स्तरावर गट-क अनुकंपा प्रतीक्षासूची एकत्रित करण्यात आली आहे. या प्रक्रियेत अनुकंपा तत्त्वावर गट-क पदांवर नियुक्तीसाठी उपलब्ध असलेल्या रिक्त पदांची माहिती सर्व प्रतीक्षासूचीतील उमेदवारांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. शासनाच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली येथे दि. २९ ऑगस्ट व २ सप्टेंबर रोजी एकूण ३२ उमेदवारांचा मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात उमेदवारांकडून नियुक्तीबाबत विकल्प घेण्यात आले असून शैक्षणिक पात्रता व उपलब्ध रिक्त पदांनुसार नियुक्ती प्राधिकाऱ्यांकडे शिफारस करण्यात येणार आहे.
शासनाने ठरवून दिलेल्या वेळापत्रकानुसार संबंधित नियुक्ती प्राधिकाऱ्यांनी शिफारस केलेल्या अनुकंपा उमेदवारांना दि. १५ सप्टेंबर रोजी नियुक्ती आदेश देण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.
*****
Subscribe to:
Posts (Atom)